Ad will apear here
Next
पं. प्रभुदेव सरदार, पं. रमेश मिश्र, विलायत खाँ


ज्येष्ठ गायक पंडित प्रभुदेव सरदार, प्रख्यात सारंगीवादक पंडित रमेश मिश्र आणि 
ज्येष्ठ सतारवादक विलायत खाँ यांचा १३ मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय....
.........
पं. प्रभुदेव सरदार
चार सप्टेंबर १९२५ रोजी पं. प्रभुदेव सरदार यांचा जन्म झाला. शुद्धता, शुचिर्भूतता आणि सात्विक वृत्ती ही पं. प्रभुदेव सरदार यांची स्वभाव वैशिष्ट्ये. त्यांच्या दैनंदिन जीवनात जसा या वैशिष्ट्यांचा प्रभाव दिसे, तसाच संगीतशास्त्र, स्वरविद्या, रागविद्या, बंदिशीमध्येही दिसत असे. स्वरांच्या शुद्धतेवर त्यांचा विशेष कटाक्ष असे. आपल्या बुजुर्गांनी केलेल्या राग, बंदिशी यांच्या शुद्धतेला त्यांनी विशेष महत्त्व दिले, त्यांचे पावित्र्य जपले. त्याचबरोबर नवनिर्मिती करतानाही मूलतत्वाचा पाया भक्कम ठेवण्याचा गुरुजींचा ध्यास असे. 

नव्या, जुन्या सर्व शिष्यांना स्वरज्ञानाचे महत्त्व ते वारंवार सांगत. स्वरांचे खास स्थान असते, त्यांना प्रकृती असते, त्यातून तो भाव जिवंत होणे महत्त्वाचे असते. गुरुजी कायम सांगत की, रागांत जिवंतपणा आला पाहिजे. गुरुजींच गाणं हे उत्कट भावनांनी चिंब भिजलेलं असे. पं. प्रभुदेव सरदार हे बेळगांवच्या राणी कित्तूर चन्नमा यांचे सरदार गुरुसिद्धय्या सरदार यांचे थेट वंशज. सरदारांचे मूळ अडनाव चरंतीमठ. पण राणी कित्तूर चन्नमांचे सरदार असल्याने त्यांना ही पदवी मिळाली होती. पं. प्रभुदेव सरदारांचे वडील मडीवाळेश्वनर सरदार हे सोलापूरला आले व सोलापुरातच स्थायिक झाले.

मडीवाळेश्वनर सरदार हे बॅरिस्टर होते. सोलापूरचे ख्यातनाम वकिल होते. अनेक वर्षे सरकारी वकील म्हणून काम करूनही त्यांनी गाणे आत्मसात केले. त्यांचा आवाज अत्यंत गोड होता. तो त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवला होता. वकिलीबरोबरच संगीताची मोठी सेवा त्यांनी केली. 

पं. प्रभुदेव सरदार यांना आग्रा घराण्याचे पं. जगन्नाथबुवा पुरोहित व जयपूर घराण्याचे पं. निवृत्तीबुवा सरनाईक यासारख्या दिग्गजांकडून तालीम मिळाली. या दोन्ही गुरूंचे पं. प्रभुदेव सरदार हे गंडाबंध शिष्य होते. त्यांच्याकडून त्यांना असंख्य राग शिकायला मिळाले. जगन्नाथबुवांनी प्रचलित रागांबरोबरच राग स्वानंदी, जौन भैरव आदींसारखे अनेक अप्रचलित राग शिकवले. शिवाय ललत रागातील ‘जा जा रे जा रे बलमवा’, नट भैरव रागातील ‘गुंज रही किरत तुम्हरी’, जौन भैरव मधील ‘लाडली री मोरी’ आदी बंदिशी गुरुजींना विशेष प्रिय होत्या. जगन्नाथबुवांनंतर निवृत्तीबुवांकडून त्यांना भरभरून रागविद्या मिळाली. त्यात प्रचलित रागांप्रमाणेच अप्रचलित, अनवट रागांचा जास्त अंतर्भाव होता. निवृत्तीबुवांनी अनेक सुंदर सुंदर चिजा, प्राचिन व पारंपरिक व जयपूर घराण्याच्या बंदिशी गुरुजींना शिकवल्या. 

गुरुवर्य पं. प्रभुदेव सरदार म्हणजे रागांचा आणि बंदिशींचा चालता बोलता कोशच होते. अनेक रागांचा व बंदिशींचा प्रचंड खजिना पं. प्रभुदेव सरदारांकडे होता. पं. प्रभुदेव सरदार म्हणजे मैफिलीचे बादशाहच होते. त्यांची मैफल हमखास रंगत असे. मैफिलीत जान आणणे त्यांना सहज साध्य झालेले होते. मैफलीत राग शंकरा, बिहाग, दरबारी, मेघ, श्री, मुलतानी, बसंत, तिलककामेद, सरस्वती, पुरियाधनश्री, गौड सारंग, गौड मल्हार, बहार, गुजरी तोडी, बिलासखानी तोडी, भैरव, देसी, जौनपुरी, कौंसी, जैताश्री, सावनी, सुहा, खट तोडी असे राग गाऊन मैफल जिंकण्याची हतोटी त्यांना प्राप्त होती.

आक्रमक लयकारी, तालाच्या लग्गीबरोबर स्वरांच्या गमकेची क्रीडा आणि प्रवाही लयीचे मूळ सूत्र ही जयपूर गायकीची आणि विशेषत: पं. प्रभुदेव सरदारांच्या गायकीची बलस्थाने होती. बंदिशीचा अर्थ, त्यातील भाव, रागांची प्रकृती यांचा लालित्यपूर्ण मिलाफ हेच त्यांच्या मैफली रंगण्याचे मर्म होते. गाताना गुरुजी कधीही वेडावाकडा चेहरा, अंगविक्षेप, मुद्राभंग आदी भाव करून गात नव्हते. त्यांची मुद्रा प्रसन्न व शांत असे. गाताना रसिकांशी ते थेट संवाद साधत.

पं. प्रभुदेव सरदार यांना उस्ताद अमीर खॉ, पं. मल्लिकार्जुन मन्सूर , पं. कुमार गंधर्व, डागर बंधू, उस्ताद सईदुद्दीन डागर ह्या गायकांनी प्रभावित केले होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे ख्याल गायनातील शुद्धता. 

पं. प्रभुदेव सरदारांच्या शिष्यांमध्ये सुजन साळकर, श्याम गुंडावार, दीपक कलढोणे, रमेश कणबसकर, त्यांच्या कन्या पार्वती माळेकोपमठ यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये त्या खूप लोकप्रिय आहेत. त्या आपल्या वडिलांची गायकी त्या तोलामोलाने गातात. प्रभुदेव सरदार यांचे १३ मार्च २००८ रोजी निधन झाले. 
.......
पं. रमेश मिश्र
दोन ऑक्टोबर १९४८ रोजी पं. रमेश मिश्र यांचा जन्म झाला. गळ्यातून निघणाऱ्या स्वरांशी तंतोतंत मिळणारे स्वर सारंगीतून व्यक्त होऊ शकतात. त्यामुळेच भारतीय संगीताचा अविभाज्य घटक बनलेल्या सारंगीला अनेक दशके अतिशय मानाचे स्थान मिळाले. हार्मोनिअमच्या आगमनानंतर सारंगी या वाद्याची पीछेहाट सुरू झाली. तशाही स्थितीत सारंगीला जिवंत ठेवणाऱ्या कलावंतांमध्ये पंडित रमेश मिश्र यांचे स्थान फारच वरचे होते.

ज्या वाद्याचा झगमगाट संपला आहे, त्याला जगाच्या नकाशावर तळपत ठेवण्याचे जे कार्य पं. मिश्र यांनी केले, त्यास तोड नाही. सुलतान खाँ यांच्यासारख्या दिग्गज कलावंताने आणि नंतरच्या पिढीतील त्यांच्या शिष्यवर्गाने सारंगी टिकवून ठेवली हे तर खरेच, परंतु पं. मिश्र यांनी सारंगीला पाश्चात्त्य संगीताच्या दरबारातही मोलाचे स्थान मिळवून दिले. पस्तीस तारा असलेल्या या वाद्यावर प्रभुत्व मिळवणे, ही फारच कठीण बाब. मिश्र यांना त्यांचे वडील पं. रामनाथ मिश्र यांच्याकडूनच तालीम मिळाली. सारंगीवादनातही गायनाप्रमाणे घराणी आहेत. पं. मिश्र हे त्यांपैकी बनारस घराण्याचे. त्यांनी या वाद्यावर नुसते प्रभुत्वच मिळवले नाही, तर त्यावर अनेक नवनवे प्रयोग केले. 

सारंगी हे मुख्यत: साथीचे वाद्य म्हणून पुढे आले. त्यावर स्वतंत्रपणे एकलवादन करण्यासाठी गायकाप्रमाणेच प्रतिभा असणे आवश्यक. पं. मिश्र यांनी भारतीय संगीतक्षेत्रात सारंगी अस्तंगत होत असतानाच अमेरिकेत प्रस्थान ठेवले. तेथील संगीतकारांना या अद्भुत वाद्याचा गळ्याशी असलेला ताळमेळ हा एक चमत्कार न वाटता तरच नवल! सतारवादक पं. रविशंकर यांनी भारतीय संगीताला तेथील संगीतकारांपर्यंत पोहोचवले होतेच. त्या पार्श्वभूमीवर पं. मिश्र यांचे अमेरिकेतील स्थलांतर सुकर म्हणावे असे झाले. 

एरो स्मिथ या अमेरिकेतील प्रख्यात कलावंताबरोबर ‘नाइन लाइव्ह्ज’ या अल्बममध्ये रमेश मिश्र यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या तेथील अस्तित्वावर सांगीतिक शिक्कामोर्तब झाले. जगभर भारतीय संगीताच्या प्रसाराबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळणे ही स्वाभाविकच गोष्ट होती. पाकिस्तानला पाठवण्यात आलेल्या सांस्कृतिक शिष्टमंडळात त्यांना पं. नेहरू यांनी अगत्यपूर्वक आमंत्रित केले होते. पाश्चात्त्यांना भारतीय संगीताची गोडी लावणाऱ्या पं. रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यानंतर पं. मिश्र यांचे कार्य अधोरेखित करावे एवढे मोठे आहे. पंडित रमेश मिश्र यांचे निधन १३ मार्च २०१७ रोजी झाले.
....


विलायत खाँ
२८ ऑगस्ट १९२८ रोजी विलायत खाँ यांचा जन्म झाला. त्यांचे घराणे मूळचे रजपूत; पण पुढे मुस्लिम धर्म स्वीकारलेले. घराण्यात सूरबहार आणि सतारवादनाची पिढ्यानपिढ्यांची परंपराच होती. त्यांचे वडील उस्ताद इनायत खाँ हे त्या काळचे इटावा किंवा इमदादखानी घराण्याचे आघाडीचे सूरबहार आणि सतारवादक होते. काका वाहिद खाँ यांच्याकडे त्यांचे सूरबहार आणि सतारीचे शिक्षण सुरू झाले. आई बशीरन बेगम यांचे माहेरचे घराणे गायकांचे. त्यामुळे आजोबा उस्ताद बंदे हसन आणि आई बशीरन बेगमकडून विलायत खाँसाहेबांना गायकीची तालीम मिळायला लागली. 

एक वेळ अशी आली की सतारवादनाकडचे त्यांचे लक्ष कमी होत गेले आणि गायकीकडचा ओढा विलक्षण वाढला. आपल्या मुलाचे सतारवादनाकडे दुर्लक्ष होत आहे हे लक्षात आल्यावर बशीरन बेगमना आपल्या मुलाला स्पष्टपणे ‘तुला संगीतक्षेत्रात जर नाव करायचे असेल, तर ते सतारवादक होऊनच करावे लागेल,’ असे सांगावे लागले. सतारवादनातल्या मर्यादा खाँसाहेबांमधल्या सतत अतृप्त असणाऱ्या कलावंताला, पट्टीच्या गायकाला अस्वस्थ करत होत्या. त्यांच्यावर मात करण्यासाठी खाँसाहेबांनी सतारीच्या रचनेत मूलभूत बदल करायला सुरुवात केली. ‘तब्ली, ‘जवारी’या सारख्या भागांची रचना बदलत आणि पडदे मिळवण्याच्या पद्धतीचा, तसेच चिकारीच्या तारेवर सातत्याने आघात करण्याच्या पद्धतीचा नव्या रचनेशी ताळमेळ साधत खाँसाहेबांनी सतारीतल्या मिंड, गमक वाजवताना येणाऱ्या मर्यादांवर मात केली. 

डाव्या हाताने तारा खेचण्याचे नवे तंत्र विकसित करून ख्याल गायकीतली आलापचारी, तानक्रिया तिच्या सगळ्या बारकाव्यांसकट सतारीवर उतरवायला सुरुवात केली. विलायत खाँसाहेबांची रियाजाची पद्धतही अफलातून होती. एक मेणबत्ती पेटवायची, ती विझेपर्यंत एक पलटा घोटून काढायचा. मेणबत्ती विझली की छोटीशी विश्रांती, थोडेसे धूम्रपान आणि मग पुढची मेणबत्ती पेटवायची आणि दुसरा पलटा सुरू! 

‘सिगारेटचा माझ्याइतका विधायक उपयोग कुणीच केला नसेल,’ असे पुढे खाँसाहेब गमतीने म्हणायचे. गायकीतल्या निरनिराळ्या घराण्यांचा अभ्यास करत, त्यातली सौंदर्यस्थळे सतारीवर सही सही वाजवून काढत सतारीला चक्क ‘गाता गळा’ दिला. सतारीवर वाजवल्या जाणाऱ्या ‘गायकी अंग’ या नव्या बाजाचे विलायत खाँसाहेबच जनक आहेत, ‘आर्किटेक्ट’ आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.  विलायत खाँ यांचे १३ मार्च २००४ रोजी निधन झाले. 

माहिती संकलन : संजीव वेलणकर

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZTKCK
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
पद्मा गोळे, भक्ती बर्वे, दत्ता मारुलकर मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार पद्मा गोळे, नामवंत अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार आणि संगीत समीक्षक-लेखक दत्ता मारुलकर यांचा १२ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय....
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय
देविका राणी, पं. अनंत मनोहर जोशी अभिनेत्री देविका राणी यांचा आठ मार्च हा स्मृतिदिन. ग्वाल्हेर परंपरेतले एक थोर गायक व गुरू पं. अनंत मनोहर जोशी यांचा आठ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language